निरा, प्रतिनिधी.
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले असून, नीरा-कोळविहिरे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमोल साबळे यांनी निरा येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
साबळे म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत काम करताना आम्ही पक्षीय ताकद दाखवली. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठ्या मतांनी विजय मिळवून देण्यात आमचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
तथापि, त्यांनी ठामपणे सांगितले की, “जर आम्हाला डावलले गेले, तर या वेळी ‘झेंडा ही आमचाच आणि दांडा ही आमचाच’ म्हणत पूर्ण ताकदीने निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत. आमचा पक्ष प्रत्येक गावात कार्यरत असून मतदारांशी थेट संपर्कात आहे.”
या पत्रकार परिषदेला आरपीआयचे ज्येष्ठ सल्लागार नानासाहेब हेंद्रे, माजी नायब तहसीलदार सुरेश जावळे, निवृत्त शिक्षक अनिल मसने, आणि ज्येष्ठ सल्लागार व पत्रकार सुभाष जेधे उपस्थित होते.
अमोल साबळे यांनी शेवटी सांगितले की, अनेक इच्छुक उमेदवार पक्षाकडे संपर्क साधत असून “आम्ही केवळ पाठिंबा मागण्यासाठी नाही, तर जनतेच्या हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज आहोत. ही निवडणूक आमच्या स्वाभिमानाची असेल.”

0 Comments